जालना | प्रतिनिधीबकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालना शहर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत नॅशनल नगर परिसरातील एका अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ११ गोवंशांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. याशिवाय १३ जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली असून या संपूर्ण कारवाईत सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष सतर्कता ठेवण्यात आली होती. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. त्याचदरम्यान गुरुवारी सकाळी एका गुप्त खबऱ्यामार्फत नॅशनल नगर परिसरात अवैधरित्या गोवंशांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.सकाळी सुमारे १० वाजल्यापासून संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तल सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. अधिकारी बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी नॅशनल नगर परिसरात धाड टाकत संबंधित ठिकाणी छापा मारला.छाप्यामध्ये पोलिसांना अत्यंत धक्कादायक परिस्थिती आढळून आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोवंशांचे अवशेष, मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. तपासादरम्यान तब्बल ११ गोवंशांची कत्तल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ परिसर ताब्यात घेत पंचनामा सुरू केला.यावेळी घटनास्थळी आणखी १३ जिवंत गोवंश बांधून ठेवण्यात आल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ त्या जनावरांची सुटका करत त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. या जनावरांची अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच घटनास्थळावरून सुमारे ७ लाख रुपये किमतीचे गोवंश मांस जप्त करण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात शेख मुस्ताक नूर मोहम्मद, रा. नॅशनल नगर, जालना हा व्यक्ती अवैधरित्या कत्तलखाना चालवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.विशेष म्हणजे राज्य शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असताना आणि सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असताना अशा प्रकारे खुलेआम अवैध कत्तल सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करत अवैध कत्तलखान्यांविरोधात आणखी कठोर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या कठोर भूमिकेमुळे जालना पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. चंदनझीरा पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध कत्तल व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. Post navigation स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ६ घरफोडीचे गुन्हे उघड, ३ आरोपी जेरबंदचोरीतील १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त; जालन्यातील विविध भागातील घरफोड्यांचा छडा