महसूल-पोलिसांच्या धाडीत शासकीय धान्याचा मोठा साठा उघड; साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

जालना, 18 जुलै
शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेसाठी राखीव असलेले गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी वळविण्याचा गंभीर प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड येथे उघडकीस आला आहे. पुरवठा, महसूल व पोलिस प्रशासनाने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्तपणे राबविलेल्या धाडीत ₹6 लाख 37 हजार 418 किमतीचा शासकीय धान्यसाठा, शासकीय वितरणासाठी वापरली जाणारी रिकामी पोती आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गोदाम मालकाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या धान्याच्या स्रोताचा तसेच या गैरव्यवहारामागील संपूर्ण साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दि. 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी पुरवठा व महसूल विभागाला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. अंबड शहरातील चांगले नगर परिसरातील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात शासनाच्या शालेय पोषण आहारासाठी असलेला गहू व तांदूळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाला मिळाली होती.
माहितीची खातरजमा केल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. महसूल, पुरवठा व अंबड पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्त नियोजन करून रात्री सुमारे 7.45 वाजता संबंधित गोदामावर अचानक धाड टाकली.
कुलूप तोडून केली तपासणी
धाडीदरम्यान गोदामाला कुलूप असल्याचे आढळून आले. गोदाम मालक शेख नसीर अब्बास बागवान (रा. अंबड) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पंचांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गोदामाचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गोदामाची सखोल तपासणी केली.
तपासणीदरम्यान गोदामात साठवून ठेवलेल्या धान्याबाबत कोणताही वैध परवाना, अधिकृत नोंद, खरेदी-विक्रीची कागदपत्रे किंवा साठवणुकीची नोंद उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण साठा संशयास्पद मानून पंचनामा करण्यात आला.
341 गोण्यांमधील धान्य जप्त
पंचनाम्यानुसार गोदामातून एकूण 341 गोण्यांमधील धान्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये—
गहू – 189 गोण्या एकूण वजन : 94.50 क्विंटल अंदाजित किंमत : ₹2,97,702
तांदूळ – 152 गोण्या एकूण वजन : 76 क्विंटल अंदाजित किंमत : ₹3,33,716
याशिवाय शासकीय धान्य वितरणासाठी वापरण्यात येणारी 80 रिकामी पोती तसेच ₹6,500 किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत ₹6,37,418 इतकी असून संपूर्ण मुद्देमाल पंचनाम्यासह शासनाच्या ताब्यात घेण्यात आला.
गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी तहसील कार्यालय, अंबड येथील निरीक्षण अधिकारी किरणकुमार शत्रुघ्न खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख नसीर अब्बास बागवान याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0528/2026 दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 मधील कलम 3 व 7 अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे करीत आहेत.
धान्याचा स्रोत आणि पुरवठा साखळी तपासणार
प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेला साठा शासकीय शालेय पोषण आहार योजनेशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हे धान्य कोणत्या शासकीय गोदामातून किंवा पुरवठा साखळीतून बाहेर पडले, ते गोदामापर्यंत कसे पोहोचले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी अशाच प्रकारे धान्याची बेकायदेशीर विक्री झाली आहे का, या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शासकीय धान्याचा अपहार, बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक व काळाबाजार रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू असून अशा प्रकारच्या गैरव्यवहारात सहभागी आढळणाऱ्या कोणालाही कायद्यानुसार कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना आवाहन

शासकीय योजनांतील धान्याचा अपहार, बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक किंवा काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती कोणाकडे असल्यास ती तात्काळ पुरवठा विभाग, महसूल प्रशासन किंवा स्थानिक पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *