घनसावंगी / प्रतिनिधी
घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने घनसावंगी येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यास अखेर मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत २० मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून, या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार हिकमत उढाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, घनसावंगीच्या औद्योगिक प्रगतीसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या मागणीला शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्याने स्थानिक युवक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रस्तावित औद्योगिक वसाहतीमुळे परिसरात नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळणार असून, स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे होणारे युवकांचे स्थलांतर कमी होण्यासही या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. तसेच लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
औद्योगिक विकासामुळे रस्ते, वीज, पाणीपुरवठा, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तसेच नव्या गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी घनसावंगी औद्योगिक वसाहत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
आमदार हिकमत उढाण यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच घनसावंगीला राज्याच्या औद्योगिक नकाशावर नवे स्थान मिळाले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
घनसावंगी औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीमुळे मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, आगामी काळात घनसावंगी हे उदयोन्मुख औद्योगिक केंद्र म्हणून राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *