परतूर तहसील कार्यालयांतर्गत रोहिणा (बु.) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला जालना शहरात लाच स्वीकारताना पकडले जालना, दि. ७ : शेतीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील नावे दुरुस्त करण्याच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकाने बुधवारी (दि. ७) सायंकाळी जाळ्यात पकडले. भाऊसाहेब जगन्नाथ गवारे (वय ४२), ग्राम महसूल अधिकारी, सजा रोहिणा (बु.), तहसील कार्यालय परतूर, असे ताब्यात घेतलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेती व खासगी नोकरी करतात. त्यांनी रोहिणा खुर्द येथील गट क्रमांक १०४ मधील ४४ आर शेती खरेदी करण्याचे ठरवून शेतकऱ्याशी १०० रुपयांच्या बाँडवर इसारपावती केली होती. या शेतीच्या मूळ मालकाचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील नावे दुरुस्त करण्यासाठी तक्रारदार यांनी १ ऑक्टोबर रोजी जालना येथे भाऊसाहेब गवारे यांची भेट घेतली होती. त्यावेळी संबंधित कामासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदार यांनी ६ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान गवारे यांनी संबंधित कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यानंतर बुधवारी (दि. ७) रात्री सुमारे ८.४० वाजता जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील आस्था हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून पंचासमक्ष ५० हजार रुपये स्वीकारताना गवारे यांना त्यांच्या खासगी कारमध्ये लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईसाठी पोलीस हवालदार गजानन घायवट, पोलीस अंमलदार मनोहर भुतेकर, संदीप लहाने, शिवलिंग खुळे, गणेश चेके तसेच चालक पोलीस हवालदार बिनोरकर यांनी सहभाग घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. Post navigation अंबडमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश