जालना, दि. १६ (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक आणि बेकायदेशीर धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत जालना स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. मोती बार समोर सापळा रचून पोलिसांनी एका महिंद्रा जितो वाहनातून अवैध दारूचा मोठा साठा जप्त करत सुमारे ६.७२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी ‘रुपम वाईन्स’च्या मालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाला नवीन मोंढा परिसरातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवार, दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी ४.१० वाजता सापळा रचून संशयित पांढऱ्या रंगाचे महिंद्रा जितो (क्र. MH-21-BH-7559) वाहन अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनातून विदेशी व देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी एकूण ५,११,४४० रुपयांची विदेशी दारू व बिअर तसेच ११,५२० रुपयांची देशी दारू जप्त केली. यासोबतच १,५०,००० रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६,७२,९६० रुपये इतकी आहे. जप्त दारू साठ्यात रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल चॅलेंज, मॅकडॉवेल्स नं. १, स्टर्लिंग रिझर्व्ह, मॅजिक मोमेंट्स, ग्रँड मास्टर यांसह विविध ब्रँडच्या बिअरचा समावेश आहे. तसेच देशी दारूचेही काही बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी नोआ दीपक चव्हाण (वय २८, रा. शकुंतला नगर, मंठा चौफुली, जालना) आणि ‘रुपम वाईन्स’चे मालक राम सेट यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. Post navigation जाफ्राबाद जळीत कार प्रकरणाचा थरारक उलगडा; स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणारा मुख्य सूत्रधार फरार अंबडमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश