“मुंबई-पुण्यात इंधन मिळते, मग मराठवाड्यालाच टंचाई का?”; तहसील प्रशासनावर मनसेची टीका

जालना | प्रतिनिधी

जालना शहरासह मराठवाड्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नसताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

रत्नपारखे म्हणाले की, जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकरी, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. मात्र याकडे जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कमांड किंवा नियोजन प्रशासनाकडून दिसत नाही,” असेही ते म्हणाले.

“पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात उपलब्ध आहे, मग फक्त मराठवाड्यातच टंचाई का निर्माण झाली? मुंबई आणि पुणे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का?” असा उपरोधिक सवालही राहुल रत्नपारखे यांनी उपस्थित केला.

पेट्रोल पंप मालकांची थकबाकी बाकी असल्यामुळे अनेक पंपांवर इंधनाचा पुरवठा होत नसल्याची माहिती समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना इशाराही दिला. “प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा किती साठा उपलब्ध आहे, याचे बोर्ड तात्काळ लावावेत. नागरिकांना खरी माहिती दिली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल,” असा इशारा राहुल रत्नपारखे यांनी दिला.

मराठवाड्यातील इंधन टंचाईवर राज्य शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *