“शेतकरी टिकला तर देश टिकेल; मग शेतकऱ्यांनाच डिझेलसाठी भटकंती का?” — रूपम घुगे

जालना | प्रतिनिधी भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. शेतकरी टिकला तरच देश टिकेल. मात्र आज खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे,” असा घणाघाती आरोप ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे यांनी केला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी डिझेल-पेट्रोल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना रूपम घुगे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे वक्तव्य केले होते. मग प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाईनमध्ये का उभे राहावे लागत आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पहिला पाऊस सुरू होण्याच्या तोंडावर शेतकरी शेत मशागतीच्या तयारीत आहेत. ट्रॅक्टर, पंप आणि शेतीची इतर यंत्रणा चालवण्यासाठी डिझेल अत्यावश्यक असताना शेतकऱ्यांना वेळेवर इंधन मिळत नसल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. “आज आपण दोन वेळच्या जेवणासाठी शेतकऱ्यावर अवलंबून आहोत. मात्र त्याच शेतकऱ्याला डिझेलसाठी भटकावे लागत असेल तर ही शासनासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असेही घुगे म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती. यावरही रूपम घुगे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “जर परिस्थिती इतकी गंभीर होती तर उपाययोजना आधी का करण्यात आल्या नाहीत? ३० जूनची वाट का पाहिली जात आहे?” असा सवाल केला.

जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. “शेतकरी अनेकदा शेतात असतो. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर घेऊन पंपावर जाणे शक्य नसते. मग कॅनमध्ये डिझेल मिळाले नाही तर शेतकऱ्यांनी शेतीची कामे कशी करायची?” असा प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला.

शासनाने तातडीने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल पुरवठा व्यवस्था करावी, ग्रामीण भागातील पंपांवर विशेष सुविधा द्याव्यात आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही रूपम घुगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *