जालना | प्रतिनिधी :

मलेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशनचा परतूर येथील खेळाडू राहुल याने भारताचे प्रतिनिधित्व करत सिंगल स्टिक (Single Stick) आणि स्वॉर्ड स्पिनिंग (Sword Spinning) या दोन्ही प्रकारांत दोन कांस्यपदके पटकावत जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जालना जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात अभिमानाने झळकले आहे.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातील १० खेळाडू पात्र ठरले होते. मात्र राहुलची आर्थिक व वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, या उदात्त भावनेतून इतर पात्र खेळाडूंनी परस्पर संमतीने राहुलला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोणाच्याही विरोधात नसून, खेळाडूंमधील विश्वास, त्याग, सहकार्य आणि खऱ्या अर्थाने क्रीडाभावनेचे प्रतीक ठरला. राहुलनेही या विश्वासाचे सार्थक करत दोन कांस्यपदके जिंकून सर्वांच्या निर्णयाला योग्य ठरवले.

राहुलच्या या यशामागे जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रशिक्षक व मराठवाडा विभागप्रमुख भूषण यादव, तांत्रिक सल्लागार प्रा. डॉ. नितीन भक्त तसेच परतूरचे प्रशिक्षक रोहित जैस्वाल यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि दर्जेदार प्रशिक्षण लाभले.

राहुलच्या या ऐतिहासिक यशाबद्दल जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मुकुंद यादव, साई बनसुरी, भरत सतिकर, सौ. कोमल भक्त, सौ. शीतल यादव, उषा पवार, दिपाली कुलकर्णी, प्रेरणा जरींग, गायत्री सोरटी, प्रतीक्षा दब्बडवार, आनंद झारकंडे, किरणराजे देशमुख, अजय सरकटे, किशोर माधोवाले तसेच सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि सदस्यांनी राहुलचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याचबरोबर राहुलला संधी मिळावी म्हणून मोठेपणा दाखवणाऱ्या इतर पात्र खेळाडूंच्या निर्णयाचेही विशेष कौतुक करण्यात आले.

या उल्लेखनीय यशामुळे जालना जिल्ह्यातील सिलंबम चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यात आणखी खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्यासाठी जालना जिल्हा सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *