जाफ्राबाद, 2 जून जाफ्राबाद-चिखली मार्गावरील गोपी शिवारात जळालेल्या कारमध्ये आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले असून, कर्जातून मुक्तता आणि विम्याची रक्कम मिळविण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचा प्रकार जालना पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपी शिवार येथे ३१ मे रोजी पहाटे एका अल्टो कारला आग लागून त्यामध्ये एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. प्रथमदर्शनी ही घटना अपघाती स्वरूपाची वाटत असल्याने जाफ्राबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.मात्र, जालना पोलिसांनी केलेल्या बारकाईच्या आणि तांत्रिक तपासातून या घटनेमागील कट उघडकीस आला. तपासादरम्यान कथित मृत नितीन प्रभाकर गवळी याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले. विविध कर्जांपासून सुटका मिळविणे, विम्याची रक्कम प्राप्त करणे आणि वैयक्तिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी हा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे.पोलिस तपासात नितीन गवळी याने अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्या मदतीने नाशिक येथील संदीप चौहान या तरुणाचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह अल्टो कारमध्ये ठेवून वाहनास आग लावण्यात आली आणि अपघातात नितीन गवळीचा मृत्यू झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला.या प्रकरणी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ६२(२)(अ), २३८(अ)(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून या कटाचा मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. तसेच जळालेल्या मृतदेहाची शास्त्रोक्त ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अत्यंत कमी कालावधीत या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावत नियोजनबद्ध खून आणि फसवणुकीचा कट उघडकीस आणल्याबद्दल जालना पोलिसांच्या तपासकामगिरीचे कौतुक होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. Post navigation घनसावंगीच्या औद्योगिक विकासाला गती; औद्योगिक वसाहतीला शासनाची हिरवी झेंडी जालन्यात एलसीबीची मोठी कारवाई; ‘रुपम वाईन्स’ मालकासह दोघांवर गुन्हा, ६.७२ लाखांची अवैध दारू जप्त