जालना | प्रतिनिधीजालना शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. शहरातील नाल्यावरील अतिक्रमण हटविणे आणि नालेसफाईच्या कामासाठी ४० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे महानगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.या कारवाईत जालना महानगरपालिकेतील प्रभारी सहायक अतिक्रमण पथक प्रमुख भाऊलाल चापा राठोड (वय ५७) आणि प्रभारी सहायक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख श्यामसन छबुराव कसबे (वय ५१) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही अधिकारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी शहरातील मामा चौक ते कोलू तेली घाणा संघ परिसरातील नाल्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती.तक्रारदारांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन अतिक्रमण हटवून नालेसफाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनपा उपायुक्तांकडून संबंधित अतिक्रमण विभागाला स्थळ पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.आरोपी अधिकारी राठोड आणि कसबे यांनी आपल्या पथकासह संबंधित भागाची पाहणी केली. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई न करता तक्रारदारांना वारंवार टाळाटाळ करण्यात आली. अखेर “काम करायचे असेल तर खर्च करावा लागेल” असे सांगत ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.सदर प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदारांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली.एसीबीने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत दि. २० मार्च २०२६ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. या पडताळणीत आरोपी अधिकाऱ्यांनी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन केले.दि. २८ मे २०२६ रोजी जुना मोंढा परिसरातील बाबा टी हाऊस येथे तक्रारदार आणि आरोपी यांच्यात व्यवहार ठरला होता. एसीबीच्या पथकाने परिसरात सापळा रचला. तक्रारदारांकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच श्यामसन कसबे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील दुसरे आरोपी भाऊलाल राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले.कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे. तसेच लाच म्हणून स्वीकारलेली ४० हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.या कारवाईमुळे जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात नालेसफाई आणि अतिक्रमण हटविण्याच्या कामांमध्ये नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्याच्या चर्चांना या घटनेमुळे पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे पावसाळा तोंडावर असताना शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असल्याचे मनपाकडून सांगितले जात असतानाच संबंधित अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप झाल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली.या सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे, पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, पोलीस हवालदार राजेंद्र सिनकर, राजेंद्र जोशी, चांगदेव बागुल आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ७७२०८९१०६४ उपलब्ध करून देण्यात आला आहे. Post navigation शेतकरी डिझेलसाठी रांगेत, सरकारचे दावे हवेत; ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे यांचा संतप्त सवाल घनसावंगीच्या औद्योगिक विकासाला गती; औद्योगिक वसाहतीला शासनाची हिरवी झेंडी